जगायचं तर बदलायला शिका
July 14, 2025
0
पूण्यश्लोक न्यूज,
गावाच्या मातीत वाढलेली पिढी राबराब राबते, पिकं पिकवते, पण त्यांचं मोल ठरवतं शहरातल्या एसी रूममध्ये बसलेलं कोणी तरी. शेतकऱ्यांनो, हे लक्षात ठेवा—पुढच्या पिढीला टिकवायचं असेल, तर शिक्षणाची वाट धरायलाच हवी.
हो, सुरुवातीला तुमची मुलं अडचणींना सामोरं जातील. शहरात चाकरीच्या शोधात काट्यांवर चालावं लागेल. पण हे काही काळाचं दुःख, अशिक्षित राहून आयुष्यभर संधी गमावण्यापेक्षा या संघर्षाला सामोरं जाणं केव्हाही चांगलं.
शहरं आता बोलूनसुद्धा गंडवायला शिकली आहेत. आणि आपण अजूनही प्रामाणिकपणाच्या धाग्यात गुंतलेलो. आजचा जमाना असा झालाय की फसवणूक करणाऱ्यांना शहाणं मानलं जातं. तुम्ही प्रामाणिकपणे दूध विकता, पण शहरात तेच दूध बाटलीत भरून शंभर रुपयांनी विकलं जातं.
ज्यांचे करोडोंचे धंदे चालतात, ते कर भरत नाहीत. पण "शेतकरी टॅक्स भरत नाही" म्हणून उगाच गळा फाडतात. ज्यांना आपल्या बाल्कनीत झाडं जगवता येत नाहीत, ते ऊस न लावण्याचे सल्ले देतात. त्यांना काय कळणार?
ज्यांच्या गॅलरीत कबुतरं हागतात, ते सांगतात "गाय पाला!" आणि त्याच गायी रस्त्यावर दिसल्या की हाकलून लावतात. अशा लोकांकडून तुम्ही सेंद्रिय शेती शिकायची? शहरात जे नदीत घाण सोडतात, ते तुम्हाला नैतिकतेचे धडे देतात!
गावात अजूनही पक्के रस्ते नाहीत, वीज येते आणि जाते. शाळा उभी करायची तर गावकऱ्यांनी खिशातली वाकडी नोट काढावी लागते. पण गावकरी झुकतं माप देतात—सामूहिक श्रमदान करतात. आणि आम्ही शहरातले? रविवारी एकदा गावात येतो, चार फोटो काढतो, स्टेटस ठेवतो आणि पुन्हा आपल्या ACच्या खोलीत मस्त झोपू.
म्हणून शेवटी एवढंच सांगायचं आहे—
मुलांना शिकवा. गरज पडली तर थोडं कठोर व्हा, पण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं रहा. शिक्षणच त्यांचं खरं भविष्य आहे—आणि गावाचंही!
लेखक .बाजीराव चौरे सहसंपादक पूण्यश्लोक न्युज,

Post a Comment
0 Comments