पूण्यश्लोक न्यूज..
मुरुड, ७ ऑगस्ट २०२५ – मुरुड शहरातील बस स्थानक हे जनता विद्यामंदिर, समाज जागृती विद्यालय, मुरुडेश्वर विद्यालय, छत्रपती संभाजी महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाविद्यालय या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रवास केंद्र ठरले आहे. दररोज शेकडो विद्यार्थी याठिकाणी ये-जा करत असतात.
मात्र, अलीकडील काही महिन्यांत बस स्थानक परिसरात घडणाऱ्या अनुचित घटनांमुळे विद्यार्थी, विशेषतः मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार, काही उपद्रवी तरुणांकडून छेडछाड, हुज्जतबाजी आणि विनाकारण गर्दी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. परिणामी, पालक आणि शिक्षकांमध्ये अस्वस्थता आणि चिंता वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर मुरुडमधील सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, आणि पालक वर्गाने प्रशासनाकडे बस स्थानकात कायमस्वरूपी पोलीस चौकी स्थापन करण्याची ठाम मागणी केली आहे.
"पोलीस चौकी असल्यास विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळेल आणि उपद्रवी प्रवृत्तींना आळा बसेल," असे नागरिकांचे म्हणणे आहे. चौकीमुळे केवळ सुरक्षा वाढणार नाही, तर शिस्तीचाही भक्कम पायाभूत पाया बसलेला राहील, असेही मत व्यक्त करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा ही प्राथमिक गरज असून, प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी सध्या मुरुडमध्ये जोर धरत आहे...
Post a Comment
0 Comments