Type Here to Get Search Results !

रक्षाबंधन,बहीण भावाच्या नात्याचा सण.... पवण थोटे..

 


.                         


    रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे,जो दक्षिण आशिया तसेच जगाच्या इतर भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांद्वारे साजरा केला जातो.या दिवशी सर्व वयोगटातील बहिणी त्यांच्या भावांच्या मनगटाभोवती राखी म्हणजे एक पवित्र आणि आकर्षक दोर विधिवत बांधतात.ही राखी त्यांच्या भावांकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते.परंपरेनुसार राखी बांधल्यानंतर भाऊ बहिणीला भेटवस्तू देतो.

रक्षाबंधन हा श्रावणातील प्रमुख सण आहे.यामध्ये बहिणी आपल्या भावाला राखी बांधतात.रक्षाबंधन हा हिंदू दिनदर्शिकेतील श्रावण महिन्यात साजरा केला जातो,जो सामान्यतः ऑगस्टमध्ये येतो.रक्षाबंधन ह्याचा शब्दशः संस्कृत अर्थ "संरक्षण, बंधन किंवा काळजी" असा होतो. बहीण-भावाचा हा सण,ज्याचा उगम लोक-संस्कृतीमध्ये झाला,त्याला स्थानानुसार वेगवेगळी नावे होती; काही ठिकाणी सलुनो,सिलोनो,आणि राकरी असे म्हणले जात होते.

विवाहित स्त्रियांसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. काही प्रदेशांमध्ये किंवा गावांमध्ये बहिर्विवाह प्रथा आहे.यामध्ये वधू तिच्या जन्माच्या गावाबाहेर लग्न करते आणि प्रथेनुसार तिचे पालक तिच्या विवाहित घरी जात नाहीत.उत्तर भारतातील ग्रामीण भागांत जिथे अनेक खेड्यांमध्ये बहिर्विवाह पद्धती प्रचलित आहे, तिथे मोठ्या संख्येने विवाहित हिंदू स्त्रिया दरवर्षी त्यांच्या पालकांच्या घरी सणासाठी परत जातात.त्यांचे भाऊ,जे विशेषतः पालकांसोबत किंवा जवळपास राहतात,कधीकधी त्यांच्या बहिणींच्या विवाहित घरी त्यांना परत घेऊन आणण्यासाठी जातात.अनेक तरुण विवाहित स्त्रिया त्यांच्या जन्माच्या घरी काही आठवड्यांपूर्वी येतात आणि समारंभ होईपर्यंत राहतात.भाऊ हे बहिणीचे सासर आणि माहेर यांच्यामध्ये आजीवन मध्यस्थ म्हणून काम करतात.

तत्कालीन राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना राखी बांधताना एक लहान मुलगी शहरी भारतात, जिथे कुटुंबे अधिकाधिक विभक्त होत आहेत,तिथे हा सण अधिक प्रतीकात्मक बनला असला तरीही तो खूप लोकप्रिय आहे.या उत्सवाशी संबंधित विधी त्यांच्या पारंपारिक प्रदेशांच्या पलीकडे पसरले आहेत.तंत्रज्ञान,स्थलांतर, चित्रपट,सामाजिक संवाद,आणि हिंदू धर्माच्या राजकीय प्रचाराद्वारे या सणाचे स्वरूप बदलले जात आहे.

रक्ताचे नाते नसलेल्या स्त्रिया आणि पुरुषांमध्ये स्वैच्छिक नातेसंबंधांची एक बदललेली परंपरा देखील आहे.यासाठी जाती आणि वर्गाच्या पलीकडे, तसेच हिंदू आणि मुस्लिम हा भेद विसरून राखी बांधली जात आहे.

भावाला राखी बांधणारी बहीण

हिंदू पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस असेल तर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या पौर्णिमेला साजरी करतात.याच दिवसाला'रक्षाबंधन' म्हणतात.या दिवशी रक्षाबंधनाचा कार्यक्रम असतो.हा सण बहीण भावाच्या अतूट,उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस आहे. श्रावण पौर्णिमेस राखी बांधावी, असे धर्मशास्त्रात म्हणले आहे.या विधीस 'पवित्रारोपण' असेही म्हणतात. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे,ही यामागची मंगल मनोकामना असते.

उत्तर भारतात हा सण राखी म्हणून प्रसिद्ध आहे.या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून "भावास दीर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो" अशी कामना करतात.राखी बांधण्याचा अर्थ ती बांधणाऱ्या व्यक्तीच्या प्रेमरूपी बंधनात स्वतःला गुंतवून त्या व्यक्तीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणे.राखी बांधण्याच्या या सणातून स्नेह व परस्परप्रेम वृद्धिंगत करण्याची प्रथा अस्तित्वात आली आहे.रक्षाबंधन म्हणजे हातातील राखीस साक्षी मानून आपल्या बहिणीचे सदैव रक्षण करण्याचे वचन देणे.काही प्रांतात नोकर आपल्या मालकाला,ब्राह्मण आपल्या यजमानाला,मुलगी आपल्या वडिलांना,आणि पत्नी नवऱ्याला राखी बांधते.आपल्यापेक्षा बलवान,समर्थ माणसाला राखी बांधून आपल्या रक्षणाचे वचन घेणे हीच यामागची भावना आहे.भारतीय समाजात ऐक्‍य आणि प्रेमभाव वाढीस लागावा यासाठी रक्षाबंधनाचा सण राजपूत लोकांत रूढ झाला.आजकाल मात्र बहीण-भावाच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणून हा सण साजरा होतो.या दिवशी बहिणी आपल्या सख्ख्या भावाच्या हातावर राखी बांधतातच आणि शिवाय त्या बंधुत्वसमान नाते असलेल्या व्यक्तीसही राखी बांधतात.

विविध प्रकारच्या राख्या बहीण या दिवशी भावाला ओवाळून त्याच्या हातावर राखी बांधते आणि आपले भावाविषयी प्रेम व्यक्त करते.या सणाचे आधारस्तंभ म्हणजे प्रेम,पराक्रम, सय्यम आणि साहस.निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजे भावा-बहिणीचं नातं होय. पूर्वजांनी भारतीय संस्कृती मध्ये या नात्याच्या पवित्रतेचा महिमा गायला आहे.आपल्या भारत देशाने संस्कृतीचे उत्तम उदाहरण देऊन मानवाला योग्य दिशा प्रदान केली आहे.स्त्री सन्मान हा सुद्धा या सणामधून दिलेला उपदेश होय.फक्त स्त्री हक्क आणि स्त्रीला वरवर सन्मान देणाऱ्या लोकांना तिचे महत्त्व कळत नाही.

‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:| यात्रेतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया:|’

ज्या कुळामध्ये स्त्रीची पूजा, म्हणजेच मान-सन्मान,सत्कार होतो,तेथे सुशील,गुणी व उत्तम मुलं होतात आणि जिथे स्त्री सन्मान नसतो तिथे कुठलीही प्रगती होत नाही.हा विचार लहानपणीपासून समाजामध्ये रुजविण्याचा प्रयत्न ह्या सणाद्वारे केला जातो.

"राखी' ह्या शब्दातच "रक्षण कर' - "राख म्हणजे सांभाळ' हा संकेत आहे.कुठल्याही कर्तबगार,धाडसी शूरवीराने याचक,दुर्बल,वृद्ध,आजारी, असहाय्य, अपंग व अबलांचे रक्षण करणे हा धर्म आहे.हेच लक्षात घेऊन याच दिवशी रेशमी धागा अशा करारी पुरुषाच्या हाती बांधून त्याच्याकडून रक्षणाचे अभय घेण्याची ही प्रथा आहे.हे अभय शास्त्राधारे पौरोहित्य करणारे पुरोहित आपल्या यजमानघरी स्वतः सर्वांना राखीचा रेशीमधागा मंत्रोच्चारांसह बांधून देतात. यातला गर्भित अर्थ नात्याचे रक्षण करणे हाच आहे.

श्रावण पोर्णिमेसच "श्रावणी" असे देखील म्हणले जाते. पाऊस पडल्यानंतर आनंदी झालेले लोक समाधानाने वेदपुराणाची कथा ऐकण्याचे उत्सव साजरे करीत. तर कुमारांना शिक्षण घेण्यास सुरुवात करण्याचा मुहूर्त याच काळात काढला जात असे. अध्ययनाचा प्रारंभ,शौर्याचे शुभचिन्ह या दोन गोष्टी मनोमन लक्षात ठेवणे व तसे आचरण करणे म्हणजे "श्रावणी' साजरी करणे होय.श्रवण नक्षत्रावर श्रावणी करतात.हा सण म्हणजे बहिण भावाचे अतूट नाते दाखवतो.  


 

                          पवन थोटे, यवतमाळ                                ९४०४५२६७७७

Post a Comment

0 Comments