पूण्यश्लोक न्यूज..
भारतीय राजकारणात काही अशी व्यक्तिमत्वे घडली की ज्यांच्या कार्यामुळे पुढील पिढ्यांनाही मार्गदर्शन मिळते. पंडित दीनदयाल उपाध्याय हे असेच एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. ते राजकारणी होते, पण केवळ राजकारणापुरते मर्यादित नव्हते. ते लेखक होते, परंतु फक्त लेखनापुरते नव्हते. ते विचारवंत होते, पण त्यांचे विचार केवळ पुस्तकात बंदिस्त न राहता प्रत्यक्षात उतरले. भारतीय जनसंघाचे नेते, अंत्योदय व एकात्म मानववादाचे प्रणेते अशा विविध पैलूंनी त्यांचे व्यक्तिमत्व उजळून दिसते.
*जन्म व बालपण :*
पंडित दीनदयालजींचा जन्म २५ सप्टेंबर १९१६ रोजी उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील नगला चंद्रभान या छोट्याशा खेड्यात झाला. त्यांचे वडील भगवतीप्रसाद उपाध्याय हे रेल्वेत लहान अधिकारी होते तर आई सीतादेवी श्रद्धाळू व संस्कारशील गृहिणी होत्या. लहानपणीच मातृपितृ छत्र हरवल्याने त्यांना संकटांचा सामना करावा लागला. परंतु याच संकटांनी त्यांना जीवनाची खरी जाण दिली आणि आत्मविश्वास व जिद्द अंगी बाणवली. दीनदयाल यांचे प्राथमिक शिक्षण राजस्थान व उत्तर प्रदेशात झाले. ते अत्यंत बुद्धिमान होते. शालेय जीवनातच त्यांनी शिष्यवृत्ती मिळवली. हायस्कूल व इंटरमिजिएटमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदके मिळवली. त्यानंतर त्यांनी कानपूर व आग्रा येथील महाविद्यालयांतून बी.ए. व एम.ए. शिक्षण घेतले. नागपूर येथे त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी परिचय करून घेतला व पुढे जीवनभर ते संघकार्याशी एकरूप झाले.
*संघकार्य व राजकारण :*
दीनदयाल उपाध्याय यांना १९३७ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत प्रथम प्रवेश मिळाला. संघाच्या शिस्तप्रिय, राष्ट्रनिष्ठ व समरसतापूर्ण वातावरणाने त्यांच्यावर खोल परिणाम झाला. त्यांनी संघाची जीवनपद्धती स्वीकारली. संघप्रेरणेने त्यांनी त्याग, सेवा, संघटन यांचा ध्यास घेतला. पुढे ते संघाचे प्रचारक निघाले. उत्तर भारतातील विविध भागात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले. १९५१ मध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. संघाच्या मार्गदर्शनात उभारणी झालेल्या या पक्षास दीनदयालजींनी कार्यकर्ता, विचारवंत व संघटक म्हणून आपले योगदान दिले. त्यांनी पक्षाची संघटनरचना उभी केली. ते पक्षाचे महासचिव झाले. त्यांची भाषणे, लेखन व विचारसरणीमुळे जनसंघ ग्रामीण व शहरी समाजात लोकप्रिय होऊ लागला.
*एकात्म मानवदर्शन :*
दीनदयाल उपाध्याय यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी मांडलेली एकात्म मानव दर्शन ही संकल्पना. भांडवलशाही व साम्यवाद या पाश्चात्य विचारधारांना ते एकतर्फी मानत. भांडवलशाहीत व्यक्तीस्वातंत्र्यावर भर देण्यात आला पण समाजहित दुय्यम ठरले. तर साम्यवादात समाजहितावर भर देण्यात आला पण व्यक्तीचे स्वातंत्र्य व स्वतंत्र अस्तित्व नष्ट झाले. दीनदयालजी म्हणाले, भारताचा मार्ग वेगळा आहे. आपली संस्कृती "सर्वे भवन्तु सुखिनः" शिकवते. व्यक्ती, समाज, निसर्ग व राष्ट्र या सर्व घटकांचे एकात्म नाते आहे. म्हणूनच त्यांनी "एकात्म मानववाद" ही तत्त्वज्ञानरूप संकल्पना मांडली. यात मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास साधायचा आहे. केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक व आध्यात्मिक विकासालाही महत्त्व आहे.
*अंत्योदयाची संकल्पना :*
दीनदयाल उपाध्याय यांचा आणखी एक महत्त्वपूर्ण विचार म्हणजे अंत्योदय. "समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाचा लाभ पोचावा" हे त्यांचे ध्येय होते. ते मानत की खरी प्रगती म्हणजे समाजातील सर्वात गरीब, दुर्बल व वंचित व्यक्तीच्या जीवनात सुधारणा घडवून आणणे. हीच संकल्पना पुढे भारतीय जनता पक्षाने आपल्या धोरणांमध्ये आत्मसात केली. पंडितजींची लेखनकला देखील अप्रतिम होती. त्यांनी पांचजन्य व स्वदेश या पत्रांचे संपादन केले. त्यांच्या लेखनातून राष्ट्रीयता, भारतीय संस्कृतीचे अभिमान, समाजनिष्ठा व मार्गदर्शन स्पष्ट दिसून येते. त्यांचे अनेक लेख व ग्रंथ आजही कार्यकर्त्यांना प्रेरणा देतात. दीनदयाल यांचा मृत्यू ११ फेब्रुवारी १९६८ रोजी अत्यंत रहस्यमय परिस्थितीत झाला. मुगलसराय रेल्वे स्थानकाजवळ त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणाला मोठा धक्का बसला. आज त्या स्थानकाचे नाव “पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन” असे ठेवण्यात आले आहे.
*आजच्या काळातील महत्त्व :*
आज भारत प्रगतीच्या मार्गावर आहे.परंतु आर्थिक प्रगतीसोबतच सांस्कृतिक मूल्ये,सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, अंत्योदय या गोष्टींचेही महत्त्व आहे. दीनदयालजींचा एकात्म मानववाद आणि अंत्योदय हे विचार आजच्या भारतासाठी अधिक सुसंगत ठरतात."सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास" ही संकल्पना प्रत्यक्षात दीनदयालजींच्या अंत्योदयाचीच आधुनिक आवृत्ती आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय हे केवळ राजकारणी नव्हते, तर ते दूरदृष्टी असलेले विचारवंत, सच्चे राष्ट्रभक्त आणि समाजसेवक होते. त्यांनी भारतीय राजकारणाला दिशा दिली. त्यांनी दिलेली एकात्म मानववादाची विचारधारा आजच्या जागतिकीकरणाच्या, स्पर्धात्मक आणि मूल्यहीन युगातही तितकीच उपयुक्त आहे. त्यांचे जीवन हे त्याग, सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. म्हणूनच ते आजही भारतीय जनमानसात मार्गदर्शक दीपस्तंभासारखे आहेत.
*दीनदयाल सेवा प्रतिष्ठान :*
दीनदयाल उपाध्याय यांच्या अंत्योदयाची संकल्पना डोळ्यासमोर ठेवून देशभरात विविध सेवा संस्था सुरू झाल्या. यवतमाळ 1997 साली दीनदयाल बहुउद्देशीय प्रसारक मंडळ -ज्याचे नाव आज दीनदयाल सेवा प्रतिष्ठान आहे- ही संस्था उभी झाली. इंग्रजांशी लढलेले शूर पारधी बांधव, ब्रिटिशांच्याच कुटीलतेमुळे दरोडेखोर ठरवून गावकुसाबाहेर ठेवण्यात आले होते. या वंचित, पीडित, विकासापासून दूर असणाऱ्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने संस्थेने सर्वप्रथम शिक्षण व आरोग्य याकडे लक्ष देऊन विवेकानंद छात्रावास सुरू केले. पाच विद्यार्थ्यांच्या बळावर श्रीगणेशा झालेल्या या छात्रावासात आज 650 हून अधिक विद्यार्थी शिकून मोठे झाले आहेत. त्यांच्या मदतीने गावकुसाबाहेरच्या पारधी बेड्यांवर स्वच्छता, रोजगार, सुरक्षा, स्वावलंबन इत्यादी बिंदू घेऊन आज अस्वच्छतेतून स्वच्छतेकडे आणि चोरी- शिकारीकडून शेती व पूरक उद्योगाकडे हा समाज वळला आहे.
2006 मध्ये शेतकरी आत्महत्यांनी यवतमाळ जिल्हा प्रकाशझोतात आला असताना या समस्येला दीनदयाल संस्थेने आव्हान म्हणून घेतले. आत्महत्याग्रस्त शेतकरी परिवारांना दत्तक घेऊन त्यांच्यासाठी कुटुंब आधार योजना राबवित 350 परिवार स्वतःच्या पायावर उभे केले. या आत्मनिर्भर परिवारातील महिला स्वतः सोबतच आपल्यासारख्या अन्य महिलांनाही आता आधार देऊ लागल्या आहेत. आत्महत्याच होऊ नये यासाठी संस्थेने शाश्वत कृषी विकास प्रकल्प सुरू केला. 7 शेतकऱ्यांना घेऊन सुरू झालेल्या या प्रकल्पात आज जवळजवळ 10 हजार शेतकरी कमी खर्चाची, शाश्वत व पर्यावरणाला अनुकूल असणारी शेती करू लागले आहेत.
याशिवाय महिलांच्या आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या किचन गार्डन प्रकल्पातून आज 9000 महिलांशी संस्थेचा थेट संपर्क आहे. एकूणच पारधी विकास, शेतकरी विकास व वंचित, पीडितांच्या सर्वांगीण विकासाकरता संस्था मोठे काम करीत आहे. या 28 वर्षाच्या कामात दीनदयाल सेवा प्रतिष्ठानला अनेक पुरस्कारही प्राप्त झाले; पण खरा पुरस्कार आहे तो या समाजातल्या शेवटच्या घटकाचा वाढवलेला आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरतेकडे झालेली वाटचाल !
-पवन थोटे,यवतमाळ. ९४०४५२६७७७


Post a Comment
0 Comments