Type Here to Get Search Results !

"स्वतःलाच चांगले करावे लागेल." : प्रा. सोमनाथ लांडगे





आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकालाच यशाची, समाधानाची आणि आत्मिक शांततेची ओढ आहे. मात्र ही यशाची वाट कुणी दुसरा आपल्या साठी तयार करून देणार नाही. चांगले घडवायचे असेल, तर स्वतःच प्रयत्न करावे लागतात. आयते यश क्वचितच कोणालातरी मिळते.


"जगात घडवायला पैसे द्यावे लागतात, बिघवायला नाही..."

कोणतीही गोष्ट घडवण्यासाठी – मग ती व्यक्तिमत्व असो, नातेसंबंध असोत, शिक्षण किंवा करिअर असो – त्यासाठी वेळ, श्रम, संयम, आणि कधी कधी पैसा देखील द्यावा लागतो. पण तीच गोष्ट बिघडवण्यासाठी कुणालाही फारसा विचार करावा लागत नाही. त्यासाठी फक्त थोडेसेच दुर्लक्ष, नकारात्मकता किंवा चुकीची संगत पुरेशी ठरते.


"घडावे स्वतःलाच लागते, बिघडवायला कोणीही तयार असते."

आपण स्वतःची जबाबदारी स्वतःच घेतली पाहिजे. समाजात अनेक लोक असे असतात, जे आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करतील, नकारात्मक विचार देतील, पण आपली प्रगती आपणच करायची असते. आपण ठरवलं तर आपल्यात प्रचंड क्षमता आहे आपल्या स्वतःलाच घडण्याची, पण त्यासाठी आपणास स्वतःच प्रयत्न करावा लागेल...


"दारूला आधी पैसे द्यावे लागतात, तर दूध उदार असते..." महिना संपल्यावर देखील दुधाचे पैसे दिले तर चालतात. ही तुलना केवळ आर्थिक नव्हे, तर नैतिकतेच्या दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावी आहे. चुकीच्या सवयींसाठी आपण तत्काळ पैसे खर्च करतो, पण आरोग्यदायी, हितकर गोष्टींसाठी आपण मागे पडतो. चांगल्या सवयीसाठी वेळ लागतो, पण परिणाम मात्र आयुष्यभर टिकणारे असतात.


"TB च्या पेशंट शेजारी बसून TB होतो, पण पहिलवानाच्या शेजारी बसून पहिलवान होत नसतं." ज्या व्यक्तीला पहिलवान व्हायचे असेल त्याला स्वतःलाच कसरत करावी लागते तरच पहिलवान होईल. 

वाईट गोष्टी संसर्गासारख्या पसरतात. पण चांगलेपणा आत्मसात करावा लागतो. नियोजन, कसरत, मेहनत, सातत्य – ही सर्व यशाकडे नेणारी सूत्रं आहेत. प्रेरणादायी लोकांची संगत योग्य असली तरी, त्यांच्या मार्गावर स्वतःने चालायच असत.


"चांगल्या गोष्टी तुम्हालाच कराव्या लागतील, वाईट करण्यासाठी लोक असतातच..."

चांगुलपणा, प्रामाणिकपणा, प्रगती – ही मूल्यं आपण जोपासली, तर आपल्याच आयुष्याला दिशा मिळते. पण हे करत असताना अडथळे येणारच. अनेकदा आपल्याच जवळचे लोक आपल्याला चुकीच्या मार्गाकडे वळवण्याचा प्रयत्न करतील. म्हणूनच अंतर्मनाने ठरवलेली चांगली दिशा कायम ठेवणं आवश्यक आहे.


स्वतःवर विश्वास ठेवा. यशस्वी होण्यासाठी प्रेरणा बाहेरून मिळते, पण कृती मात्र आतूनच यायला हवी. इतरांनी काय केलं यापेक्षा आपण काय करतो हे अधिक महत्त्वाचं आहे.

"स्वतःला स्वतःच घडवावे लागेल..."

"स्वतःलाच चांगले करावे लागेल..." 


✍️ प्रा. सोमनाथ लांडगे

▫️संचालक – श्री साई श्रद्धा एज्युकेशन

▫️Admission Counselor  

▫️Motivational Speaker

मो. 9422941929, 9552808258, 9420278258



Post a Comment

0 Comments